इंग्रजी गीताचे बोल “इन क्राईस्ट अलोन, माय होप इज फाऊंड”  म्हणजे “केवळ ख्रिस्तामध्ये माझी आशा”. हे गीत ख्रिस्त व त्याने अयोग्य पाप्यांसाठी केलेले  मुक्तीचे पूर्ण कार्य घोषित करते व पाप्यांना ख्रिस्तामध्येच सार्वकालिक आशा लाभली आहे हे स्पष्ट करते. हे किती सुंदर गीत आहे! 

केवळ ख्रिस्त तारणासाठी पर्याप्त आहे व त्याच्यामुळे पाप्यांना पूर्ण तारण लाभते व त्रैक्य देव शेवटपर्यंत पाप्यांना तारलेल्या स्थितीत ठेवतो हे सत्य खरी सुवार्ता आहे. हा ख्रिस्ती जगतामधील वादग्रस्त विषय असला, तरी अत्यंत महत्त्वाचा व अमोल विषय आहे. 

काही ख्रिस्तीतर लोक व काही ख्रिस्ती लोक असा विश्वास ठेवतात की, मनुष्य स्वतःचे तारण साधू शकतो आणि ते मानवाच्या इच्छेवर अवलंबून आहे! अर्धे कार्य  देवाचे आणि अर्धे कार्य  माणसाचे! पण हे शिक्षण पवित्र शास्त्राच्या विपरीत आहे. 

तर प्रोटेस्टंट मंडळ्या विश्वास ठेवतात की, संपूर्ण तारण हे परमेश्वराचे कार्य आहे, देवाच्या कृपेने व आत्म्याच्या कार्याद्वारे, विश्वासाच्या योगे, ख्रिस्ताद्वारे होते व तारण शास्त्रानुसार आहे!

बायबलमधील उतारे पाहू यात. त्यांत स्पष्ट शिकवले आहे की, तारण देवाचे आहे व देवच तारलेल्या लोकांचे तारण सुरक्षित  ठेवतो, म्हणजेच त्यांच्या तारणाचे जतन स्वतः देव करतो.

१. मुक्तीची सोनेरी साखळी 

“कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले” (रोमकरांस पत्र ८:२९-३०).

सार्वकालिकतेत निवड (जगाच्या निर्मितीआधी देवाने केलेली सार्वभौम निवड) ते ख्रिस्ताचे दुसरे आगमन होईल तेव्हा विश्वासणाऱ्यांना प्राप्त होणारे गौरवीकरण ही तारणाची संपूर्णतः व सधनता रोम.८:२९-३० मध्ये स्पष्ट केली आहे. देवाने निवडलेल्या लोकांना तो गौरवात नेणार याची हमी स्वतः त्रैक्य देव घेतो! 

२. देवाचा स्वभाव 

परमेश्वर अपरिवर्तनीय आहे (मलाखी ३:६  इब्री.१३:८). जर देव अपरिवर्तनीय आहे हे सत्य आमच्या मुक्तिसंदर्भात किती सांत्वनदायी आहे. त्याची तारणाची योजना व संकल्प न बदलणारे आहेत.

“कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही” (रोमकरांस पत्र 11:29).

३. ख्रिस्ताचे अर्पण पुरेसे आहे

“कारण पवित्र होणार्‍यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे” (इब्री.10:14).

ख्रिस्त हा योग्य व पात्र मुक्तिदाता आहे, तो नीतिमान, पवित्र, पापविरहित, सनातन व सर्वसमर्थ आहे. त्याचे अर्पण त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी पूर्ण खंडणी व पुरेसे आहे, त्याच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाद्वारे त्याने त्याच्या लोकांचे तारण पूर्ण केले आहे. ख्रिस्ताने त्याच्या लोकांना तारण होण्याजोगे करून सोडले नाही (अनिश्चित); परंतु त्याच्या एकमात्र खंडणीद्वारे त्याच्या मेंढरांचे तारण पूर्ण केले आहे. ख्रिस्त हा पुरेसा व सामर्थ्यशाली तारणारा आहे. त्याच्या एकमात्र अर्पणाद्वारे विश्वासणाऱ्यांचे तारण पूर्ण झाले आहे.

४. पवित्र आत्म्याचे कार्य

– पवित्र आत्म्याचा शिक्का :

“तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे: (इफिसकरांस पत्र 1:13).

शिक्का मारणे  म्हणजे 

– मालकी हक्क,

– सत्यता,

– अधिकृतता व सुरक्षितता दर्शविते. 

पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला आहे म्हणजे

– देव आता आपला मालक/स्वामी आहे.

– त्याचा अधिकार आपल्यावर आहे हे दर्शविते.

– तारणाची सत्यता दर्शविते. 

– आपल्या तारणाची अधिकृतता व सुरक्षितता दर्शविते.

पवित्र आत्म्याच्या आपल्यामध्ये केलेल्या कार्यामुळे तारण सुरक्षित आहे.

– पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे.

“देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे”

(इफिसकरांस पत्र 1:14).

“विसार” करता मूळ भाषेत अर्र्हाबॉन ἀῤῥαβών (arrhabṓn) शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ डाउनपेमेंट/ॲडव्हान्स.

देवाने पवित्र आत्मा आपल्या सार्वकालिक वतनाचा विसार म्हणून दिला आहे. पवित्र आत्मा सार्वकालिक वतनापेक्षा महान आहे. जर देवाने पवित्र आत्मा दिला आहे, तर मग तो सार्वकालिक वतनसुद्धा देईलच हे सत्य येथे नमूद केले आहे!

५. ख्रिस्ताचे अभिवचन

“ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे” (फिलिप्पैकरांस पत्र 1:6).

– देवाचे करार व अभिवचने सत्य आहेत :

फिलिप्पैकरांस पत्र १:६ एक अद्भुत अभिवचन आहे जे शिकवते की तारणाचे  कार्य सुरू करणारा  देव आहे व विश्वासणाऱ्याचे तारण पूर्ण करणारासुद्धा देव आहे. हे किती अद्भुत व सांत्वन देणारे अभिवचन आपल्याला लाभले आहे. 

६. ख्रिस्ताच्या व देवाच्या हातातून विश्वासणाऱ्यांना कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही

– दुहेरी पकड

खालील वचनात  ख्रिस्त म्हणतो की विश्वासणाऱ्यांना माझ्या व पित्याच्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. सैतान, मृत्यू किंवा आपली पापे आपल्याला पित्याच्या व पुत्राच्या हातातून हिसकावून घेणार नाहीत व घेऊ शकत नाहीत. 

मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे; आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही” (योहान 10:28-29).

– एकही हरवणार नाही

ख्रिस्ताची मेंढरे गौरवात नेण्यास आपला प्रभू येशू ख्रिस्त विजयी, मृत्युंजय व पर्याप्त आहे अशी साक्ष बायबल देते. पित्याने निवडलेले, ख्रिस्ताने खंडून घेतलेले व पवित्र आत्म्याने नवीन जन्म पावलेल्या सर्वांना सार्वकालिक जीवनासाठी उठवण्यात येणार आहे. 

“पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे” (योहान. 6:37, 39).

७. देव पतनापासून राखण्यास समर्थ आहे

”तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे” (यहूदा.1:24).

वरील वचनाकडे पाहा, हे वचन शिकवते की, विश्वासणाऱ्यांना देव पतनापासून राखतो, केवळ तो राखतच नाही, तर ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष उभे करतो. हे केवळ त्याच्या सामर्थ्याने शक्य होते.

हालेलूया! किती महान तारणारा! किती महान तारण! ख्रिस्तामध्ये विश्वासणाऱ्यांना पूर्ण विसावा मिळाला  आहे!

Pastor Mangesh A Rayarum, B.D,BBC ,Hyderabad M.Min., APIIS, Singapore

पास्टर ऑफ जीजस सेव्हज रिफॉर्म्ड बॅप्टिस्ट चर्च, एन.आय.बी.एम., पुणे, मोबा.८०८७६८५७१० 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *