पास्टर मंगेश रायारम , पुणे रिफॉम्ड बॅप्टिस्ट चर्च

21येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान.22तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे.23तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे.24देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”योहान ४ :२१-२४
भ्रष्टतेपासून मुक्ती व खरी उपासना : योहान ४ मध्ये ख्रिस्त एका भ्रष्ट व पापी स्त्री सोबत भेटून तिला मुक्तीदाता व मुक्तीबद्दल शिक्षण देतो . तिचे तारण करतो व तिला खरे उपासक व खऱ्या उपसानेबद्दल शिकवतो .योहान ४ मधील स्त्रीची स्थिती दर्शविते ख्रिस्ताशिवाय सर्व मानव भ्रष्ट ,पापी व आशाहीन आहेत . ख्रिस्ताबाहेर आपली स्थिती सुद्धा शोमरोनी स्त्री सारखीच होती .
नवीन करार व खरी उपासना : ख्रिस्त शोमरोनी स्त्रीस म्हणतो “ अशी वेळ येत आहे” , प्रभु येशु ख्रिस्त त्याचे दुःख सहन, वधस्तंभावरील प्रायश्चित, त्याच्या अर्पणाबद्दल बोलत होता.त्याच्या मृत्युद्वारे जुन्या करारातील विधीयुक्त उपासना नाहीशी होणार होती व त्याच्या बलिदानाद्वारे आत्मीक उपासना/आंतरीक उपासनेचा काळ प्रारंभ होणार होता.ख्रिस्ताद्वारे अधिक चांगला करार त्याच्या रक्ताने प्रस्थापित करण्यात आला आहे . इब्री ८:६
एक शरीर व खरी उपासना : येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या लोकांचे तारण पूर्ण करण्यात येणार होते ,अशी वेळ येणार होती जिथे निवडलेले व तारलेले यहुदी व परराष्ट्रीय एक शरीर होणार होते,यांच्यातील भेद व वैर नष्ट होऊन ख्रिस्ताद्वारे ते एकत्रीत येणार होणार होते. विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताने याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे केले आहे .
खरे मंदिर व खरी उपासना : अशी वेळ येणार होती की, माणसांनी हाताने बांधलेल्या मंदीरात जावून पशु पक्षांच्या अर्पणाद्वारे उपासना करण्याऐवजी, देव स्वतः निवडलेले व तारलेल्या लोकांना त्याचे मंदीर करणार होता . देवाचे लोक जे ख्रिस्ताने खंडून विकत घेतले आहे ते खरे मंदिर(तारलेल्या लोकांचा समूह ) आहेत .
पवित्र आत्मा व खरी उपासना : अशी वेळ येत होती की पवित्र आत्मा नेहमीकरीता त्याच्या लोकांमध्ये वास करणार होता.पवित्र आत्माच्या साह्याने विश्वासणारे ख्रिस्ताद्वारे खरी उपासना करतात .
याजक व खरी उपासना : अशी वेळ येत होती की, फक्त अहरोन व अहरोनाच्या कुळाचे याजकपण नष्ट होवून ख्रिस्ताद्वारे सर्व विश्वासी याजक बनविल्या जाणार होते.
नवीन उत्पत्ति व खरी उपासना : देवाच्या तारणाच्या कार्यामध्ये ख्रिस्त पित्यापासून पासून आलेला शेवटचे व पूर्ण प्रकटीकरण आहे.ख्रिस्ताचा मृत्यु व पुनरूत्थानाद्वारे पिता स्वतःकरीता खरे उपासक उत्पन्न करत आहे. उपासना ही किरकोळ किंवा शुल्लक कार्य नव्हे तर ख्रिस्तामधील नवीन उत्पत्ती म्हणून त्याला पवित्र आत्म्याच्या साहयाने दिलेला आभारपूर्वक प्रतिसाद आहे. खरी उपासना केवळ ख्रिस्तामधील नवीन उत्पत्तीच करू शकते व खरी उपासना विश्वासणाऱ्यांमधील देवाच्या कृपेचे कार्य आहे . खरी उपासना ख्रिसतच्या मुक्तीच्या कार्यात मुळावलेली आहे .