
खरी उपासना स्थळ केंद्रित नाही , ख्रिस्त स्वतः खरे मंदिर आहे व त्याने देवाच्या लोकांना पवित्र आत्म्याचे मंदिर केले आहे . ज्यावेळेस देवाचे निवडलेले लोक सामूहिक भक्तीसाठी एकत्रीत येऊन ख्रिस्ताद्वारे , पवित्र आत्म्याच्यायोगे ,शास्त्रकेंद्रित उपासना करतात तेव्हा देवाचे गौरव होते .
योहान ४ मध्ये येशू ख्रिस्ताने योग्य उपासनेबद्दल महत्वाचे शिक्षण दिले आहे जे सर्व युगातील ख्रिस्ताच्या मंडळ्यांकरिता महत्वाचे आहे .
उपासनेची जागा – ‘आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.” ‘योहान ४:२०
शमरोनी स्त्री यीशु ख्रिस्तासोबत संवाद साधतांना म्हटली की, आमचे (बापदादा) पुर्वज या डोंगरावर उपासना करत असे. आणि तुम्ही म्हणतात कि, जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान येरूशलेमेमध्ये आहे.
काळजीपुर्वक ख्रिस्ताचे उत्तर ऐका ,’येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. ‘योहान ४:२१
दुसऱ्या शब्दांमध्ये ख्रिस्त सांगत होता की, देवाची उपासना स्थळकेंद्रीत राहणार नाही.उपासना करण्याकरिता भुतलावरील जागा महत्वाच्या नसतील जसे जुन्या करारात होते . कितीही सुरेख व भव्य, सजवलेल्या खिडक्या ,दारे ,इमारती,वेदी,व पुतळे असले तरी त्याचा कुठलाही परिणाम खऱ्या उपासनेवर होणार नाही . त्या भौतिक गोष्टींचे असणे किंवा नसणे हे खऱ्या उपासनेचे चरित्र बदलू शकत नाही .जरी जुन्या करारामध्ये परमेश्वराने निवासमंडप व मंदीराची योजना केली होती ते परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे/इच्छेद्वारे होते. तरीही परमेश्वराने ते काढुन टाकले कारण निवासमंडप व मंदीर ते नमुने व प्रतिरूप होते व देवाने त्या सर्व गोष्टींचा वापर प्रभु येशु ख्रिस्ताच्या देहधारणेपर्यंत केला आहे. इब्री ९:२२,२८ ,कलस्सै २:१६-१७.
ज्यावेळेस ख्रिस्त देहधारी झाला आणि लोकांमध्ये त्याने वस्ती केली , त्याद्वारे प्रतिरूप व छायेचे उद्देश पुर्ण झाले.
योहान १:१४ ज्यावेळेस ख्रिस्ताचे देहधारण झाले त्यावेळेस मंदीराचा उद्देशही संपुष्टात आला. योहान २:१८-२१ मध्ये प्रभु येशु ख्रिस्त स्वतःलाच खरे मंदीर म्हणुन प्रदर्शित करत आहे.
देवाची सहभागिता देवाच्या लोकांसोबत आहे हे दर्शविण्याचे कार्य जुन्या करारात मंदिर करत असे. ख्रिस्ताच्या येण्याने लोकांची सहभागीता परमेश्वरासोबत सार्वकालिकतेसाठी झाली आहे. स्वतः ख्रिस्त मंदिर आहे प्रत्येक विश्वासणारा पवित्र आत्म्याचे मंदिर असल्यामुळे आता उपासना कोणतेही स्थान केंद्रित व मंदिर केंद्रित नाही. जुन्या करारात बांधलेले मंदिरे देवाने परराष्ट्रीय राष्ट्रांद्वारे नाश केले . खऱ्या शिष्यांसाठी आज कोणतेही मंदिर किंवा तीर्थ स्थान नाही,येशू ख्रिस्ताच्या नावात कोणत्याही जागी उपस्थित राहून ते देवासोबत संवाद करू शकतात व त्याची आराधना करू शकतात .
एका कुटुंबाला दिलेला विशेषाधिकार सुद्धा रद्द करण्यात आला असून ख्रिस्तामध्ये सर्व विश्वासणारे याजक झाले आहे – आता चर्च मध्ये केवळ अहरोन व त्याचे घराणे कार्यरत नाहीत. अहरोन व अहरोनाच्या घराण्याचे याजकपण संपुष्टात आले आहे . ते देवाचे प्रतिनिधी होते ते लोकांचे अर्पण व प्रार्थना परमेश्वरापर्यंत सादर करायचे माध्यम व मध्यस्थ होते .
आज ख्रिस्तामध्ये सर्वच विश्वासणारे त्याच्या पवित्र रक्तामध्ये शुद्ध झाले , त्यांना संत व याजक असे केले आहे . तर यापुढे ‘उपासना’ ही स्थळ केंद्रीत किंवा एक घराणे, कुटुंब केंद्रित नसुन ती नवीन जन्मावर व आत्मीक स्थितीवर अवलंबुन आहे. आणि ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेल्या मुक्तीमुळे व आत्मिक आशीर्वादामुळे खरा विश्वासणारा कुठल्याही प्रसंगी , कुठल्याही वेळी , कुठल्याही स्थळी खरी उपासना करू शकतो.
अहरोन व त्याच्या घराप्रमाणे आज आपल्याला मानवी मध्यस्थीची आवश्यकता राहीली नाही(आज पाळकवर्ग मंडळीत देवाच्या वचनाचा उलगडा करतात व मंडळींचे पालनपोषण करतात ).
कोणत्याही स्थळी आपण देवपित्याला उपासना सादर करू शकतो. आज तुम्ही देवाचे याजक, ख्रिस्तामध्ये राज्य झाले आहा. प्रकटीकरण 1ः6-7, देव मानवाच्या हातांनी बनविलेल्या मंदीरात रहात नाही. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभु असुन हातांनी बांधलेल्या मंदीरात राहत नाही.’’
प्रेषित 17ः24 ,आज देवाचे मंदीर तुम्ही आहा आणि तो तुमच्यामध्ये वस्ती करतो. ख्रिस्तामध्ये जे उपासना करतात देव त्यांच्यामध्ये वस्ती करतो. ख्रिस्ताच्या क्रुसावरील कार्यामुळे हे सर्व शक्य झाले.
पास्टर मंगेश रायारम ,८०८७६८५७१०